धागा – विद्या पेठे

एक धागा सुताचा, मंत्र देई ऐक्याचा !

      खरंच एवढासा धागा पण साऱ्या जगाशी त्याचं नातं. धाग्यांनी विणलेले कपडे परिधान करून आपण हे ऐक्य साधलं आहेच पण त्याही पलीकडे सर्वांच्या अंतरंगातून जोडला गेला आहे एक शाश्वत धागा – मानवतेचा.

      कापूस पिंजून त्यापासून पेळू, पेळू पासून सूत, सूतातून धागा. हे सारं आपण शाळेत शिकलो होतोच. पण मी जरा जवळून शिकले. कारण आम्हाला ‘सूतकताईचा’ तास होता. कापसाच्या पेळू पासून टकळीवर सूत कातायचं म्हणजे कोण कसरत ! डाव्या हातानं टकळी फिरवायची, त्याचवेळी उजव्या हातानं टकळीच्या टोकाला अडकवलेला पेळू वरच्या दिशेने खेचायचा. एकीकडे टकळी फिरवत ठेवायची कारण सुताला पीळ बसला पाहिजे. हे सारं सांभाळताना कधी टकळी आडवी व्हायची तर कधी सूत तुटायचं. पण नंतर सवयीनं हे सारं जमू लागलं. पस्तीत मिनिटांच्या तासात कोणी जास्त सूत कातलं हे बघण्यात मजा येऊ लागली. आम्ही काढलेला धागा गुंडाळून बाईंकडे द्यायचा. हा जाडाभरडा धागा खादी भांडारात जायचा म्हणे. त्याचं काय बनवत असतील ते तो धागाच जाणे. हे धाग्याशी जमलेलं माझं पहिलं नातं जे नंतर अखंड टिकलं.

      हाच धागा राखी पौर्णिमेला भावाच्या हाताला बांधला की त्याला आपण ‘राखी’ म्हणतो. लग्नात याच धाग्यात काळे मणी ओवलेलं मंगळसूत्र नववधूच्या गळ्यात शोभून दिसतं. हाच धागा हातात घेऊन सुवासिनी वडाला प्रदक्षिणा घालतात. बाळाच्या कमरेला हा धागा गोफ म्हणून शोभतो. पुरूषांनी धारण केलेलं ‘यज्ञोपवित’ ही याच धाग्यांचं. आजकाल ते अभावानेच दिसतं म्हणा. धागा एकच पण त्याची रूपे अनेक, सर्वच माणसाच्या जीवनाशी निगडित.

      धागा सर्वत्र आहे. साजशृंगाराच्या फुलवेणीत आहे, गजऱ्यात आहे.  फुलांनी गुंफलेल्या हारात आहे. देवाचा जप करायच्या जपमाळेच्या मण्यात ओवलेला आहे. नर्तकीच्या घुंगुराना बांधून ठेवणारा आहे. अगदी गवयाच्या तंबोऱ्यात सुद्ध-ा. तंबोऱ्याच्या तारांचा नाद घुमण्यासाठी ‘घोडी’ खाली बारीक रेशमी किंवा साधा लहान दोरा ओवलेला असतो. त्याला ‘जव्हारी’ म्हणतात. हा धागा तारांचा आवाज खुला व मोकळा करतो. भरतकाम, विणकाम तर धाग्याशिवाय अशक्यच. सुई-धागा हे तर एकमेकात गुंफलेलं अतूट नातं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण परिधान केलेली वस्त्रं या धाग्यापासून बनलेली आहेत.

      धागा कधी एकटा नसतो त्याच्याबरोबर सुताचे दोन-तीन तंतू असतात. त्यांना एकत्र आणून पीळ देऊन धागा बनतो. त्यामुळे त्याला बळकटी येते. लोकरीचा धागा उल-गडल-ा तर, त्यात तुम्हाला हे तीन-चार तंतू दिसतील. म्हणजेच एकमेकांत गुंफून रहाणं हा धाग्याचा महत्वाचा गुणधर्म आणि तेच त्याच सामर्थ्य. म्हणूनच आपण ‘आमच्या मैत्रीचा धागा अतूट आहे’ किंवा आमचं नातं रेशमी धाग्यासारखं आहे असं म्हणतो. कापसाच्या धाग्यापेक्षा रेशमी धागा अधिक मजबूत, चिवट असतो. तुटता तुटत नाही. हाताला वळ पडले तरी तुटत नाही. म्हणूनच नातं रेशमासारखं असावं असं म्हणतात – घट्ट तरीही मृदू, मखमली.

      धागा तुटलाच तर गाठ मारल्याशिवाय पर्याय नाही. मग ती गाठ वारंवार जाणवत रहाते. मैत्रीचं, नात्याचं ही तसंच आहे. एकदा का संशयाची, अढीची गाठ मनात बसली की ती सुटता सुटत नाही.

      याच धाग्यापासून बनतात वस्त्र. पूर्वी वस्त्र हातमागावर विणली जायची. मागावर धोटा फिरायचा. आडवे-उभे धागे विणले जायचे. त्यालाच ‘ताना-बाना’ असं म्हणतात. हे धागे गुंफणं हे खरं कौशल्याचं काम आहे. पूर्वी बनारस, कलकत्ता, कांचीपूरम् ही ठिकाणं तलम रेशमी वस्त्रासाठी प्रसिद्ध- होती. तेव्हां सुती, रेशमी, लोकरी, असे नैसर्गिक धागे वापरात होते. आता जग बदललं नायलॉन, पॉलीस्टर असे सिंथेटिक धागे बाजारात आले. ‘स्पिनिंग जेनी’ आली आणि मशीन युग सुरू झालं. धागा कापडाच्या गिरणीत गेला. विविध रंग, पोत, डिझाईन्स घेवून कापडाच्या रूपाने बाहेर पडू लागला. पण माणूस इतका हुशार प्राणी आहे की त्याने या सर्व प्रकारच्या कापडाशी अगदी सहज मैत्री केली. कारण ‘वस्त्र’ ही त्याची अत्यावश्यक गरज आहे. म्हणूनच त्याच्या मनातलं धाग्याचं स्थान अबधित राहिलं आहे.

      धागा हा सुताचाच असतो असं नाही. धातूचा सुद्ध-ा बारीक धागा बनतो. त्याल-ा ‘जर’ म्हणतात. पूर्वीच्या राजे-रजवाड्यांच्या भरजरी अंगरख्यात, राजपरीवारातील- स्त्रियांच्या शालू, पैठण्यात सोन्याच्या, चांदीच्या जरीचा वापर होत असे. ऋग्वेद काळातील- वस्त्रवर्णनात सुद्धां या जरीकामाचा उल्लेख आहे.

      जरदोसी म्हणजे जरीकाम. हा फार्सी शब्द आहे. जर  (Zar)  म्हणजे सोने आणि दोसी (Dozi) म्हणजे भरतकाम. सम्राट अकबराचा काळ हा या जरदोसी कामाचा सुवर्णकाळ मानतात. पण १९७७ मध्ये सोन्या चांदीचे भाव वाढले. जरीकाम केलेल्या साड्यांच्या किंमती परवडेनाशा झाल्या आणि सुरतेहून  बाजारात नकली जर आली. तरीही बनारसमध्ये आजसुद्धा तीन-चार घराणी अस्सल- जरीकाम करणारी आहेत. आजसुद्धा अतीश्रीमंत भारतीय व्यक्तींकडून किंवा विदेशातून अस्सल- जरीच्या वस्त्रांची मागणी त्यांच्याकडे केली जाते.

      तर असा हा धागा. इतर धाग्यांना जवळ घेऊन वस्त्र रुपाने मानवाच्या जीवनात अढळ स्थान मिळवणारा. म्हणूनच कवींच्या काव्यातून, चिंतनातूनही तो प्रगट झाला आहे. पण त्यातून या धाग्याची आणखीनच नवी, सुंदर रुपं दृष्टीला पडतात.

      श्रेष्ठ कवि ग.दि. माडगूळकर यांना वाटतं की आपला जीवनपट सुख दुःखाच्या धाग्यांनी विणला आहे आणि त्यातही सुखाच्या धाग्यांपेक्षा दुःखांच्या धाग्याचं प्रमाण अधिक आहे. म्हणूनच ते आपली भावना

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे !’

या शब्दांत व्यक्त करतात. कोणाला वाटतं आपलं जीवनवस्त्र, सत्‍व, रज, तम या त्रिगुणात्मक धाग्यांनी विणलं आहे, तर कोणाला वाटतं आपलं आयुष्य भूत, वर्तमान, भविष्य या धाग्यांत गुंफल- गेलं आहे. कविश्रेष्ठ पी.सावळाराम यांनी तर विश्वंभर पांडुरंगाला पहिला विणकर होण्याचा मान दिला आहे. ते म्हणतात,

                  ‘अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे

                  विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणले पांडुरंगे

                  विश्वंभर तो विणकर पहिला ………’

अध्यात्मात उच्च पदाला पोचलेल्या संत कबिरांना वेगळेच धागे जाणवतात. ते म्हणतात,

‘इडा, पिंगला ताना भरनी । सुषमन तारसे बीनी चदरिया

बीनी रे बीनी चदरिया ॥’

      इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्या जागृत होवून, अध्यात्म मार्गी व्यक्तीची कुंडलिनी ब्रह्मरंध्रापर्यंत पोचते. मोक्ष आणि प्राप्ती होते. म्हणून त्यांनी इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्यांना धाग्याची उपमा दिली आहे. अध्यात्म मार्गी कबीर स्वतः उत्कृष्ट विणकर होते म्हणूनच त्यांना हे सुचले असावे.

 तर असा हा ‘धागा’ बहुरूपी, बहुरंगी, बहुगुणी, सुता वरून मोक्षाला नेणारा. मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक.

 पण तुमच्या लक्षात आलं का आपणही धागेच आहोत. नि:स्वार्थी प्रेमाच्या, आपुलकीच्या, माया-ममतेच्या सुंदर रंगांचे धागे. आपण वस्त्रं विणतो जरतारी नात्यांची. आपण आहोत म्हणून नाती आहेत. माणूस आहे. ही महावस्त्र आहेत. ती जगाच्या अंतापर्यंत विणली जाणार आहेत. म्हणूनच आता मंत्र एकच ‘‘धागा धागा अखंड विणूं या.’’  

  •  लेखिकाविद्या पेठे 
     मुंबई

    प्रथम पारितोषिक (लेख)

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu