आगळं-वेगळं – बनते स्राई, कंबोडिया

नोव्हेंबर २०१७च्या सुरुवातीस मी आणि मंदिर पुरातत्वशास्त्राची अभ्यासक माझी मोठी मुलगी कंबोडियातील सियाम रीपला, मुख्यत्वे अंगकोर वाट पाहण्यासाठी गेलो होतो. अंगकोर वाट म्हणजे अद्भुत, अप्रतिम, अद्वितीय, अवर्णनीय आणि इंग्रजीतील ‘अमेझिंग’ या ‘अ’ने सुरुवात होणाऱ्या विशेषणांचा एकत्रित आविष्कार होता. परंतु तिथे गेल्यावर आमच्या पर्यटनाचा परीघ वाढला. त्या परिसरातील आमच्या भ्रमंती दरम्यान आपण सतत काहीतरी नाविन्यपूर्ण अनुभूती घेत असल्याची जाणीव होत होती.
आमचा टॅक्सी ड्रायव्हर अलेक्स  आमचा नंतरच्या दिवशीचा स्थलदर्शनाचा कार्यक्रम आम्हाला आदल्या दिवशीच्या परतीच्या प्रवासात सुचवत असे. त्याचा ‘तोनले सॅप लेक’ पाहण्याचा सल्ला एक वेगळा अनुभव देऊन गेला होता. त्यामुळे अलेक्सचं ऐकायचं यावर शिक्कामोर्तब झालं होतं. त्याने सियाम रीपच्या बाहेरचं, तासाभरात पोहोचता येण्यासारखं ‘बनते स्राई’ हे ठिकाण आम्हाला सुचवलं होतं.
सकाळी साडेनऊला ब्रेकफास्ट करून आम्ही हॉटेलच्या लॉबीत आलो. अलेक्स  आलेला होता. त्याच्या टॅक्सीतून आम्ही बनते स्राईला जायला निघालो. अलेक्सनेच सुचवलेलं हे ठिकाण असलं तरी माझ्या मुलीच्या ‘बकेट लिस्ट’ मध्येही ते होतं. माझ्यासाठी मात्र सर्वच नवीन, नवलाईचं होतं. आम्हाला मिळालेल्या माहितीपत्रकातील माहितीप्रमाणे अंगकोर वाटपासून ईशान्येस पंचवीस किमी अंतरावर ‘बनते स्राई’ हा इसवीसनाच्या दहाव्या शतकातील देवळांचा समूह आहे. जाताना वाटेत कंबोडियाच्या ‘कंट्रीसाईड’चं देखील ओझरतं दर्शन होईल, अशी अधिकची माहितीही त्यात दिली होती.

बनते स्राईला जाण्याचा रस्ता अंगकोर वाटहूनच पुढे जाणारा असल्याने अंगकोर वाटचं परत दर्शन झालं. वाटेत बरीच लहानमोठी मंदिरं दोन्ही बाजूंना दिसत होती. त्यातील महत्त्वाच्या एक-दोन मंदिरांजवळ बनते स्राईहून परतताना थांबण्याचं आश्वासन अलेक्सने दिलं. त्याच्या आजच्या सकाळच्या कार्यक्रमात बनते स्राई अग्रक्रमांकावर होतं. त्यामुळे वाटेत कुठेही न थांबता आम्ही बनते स्राईला पोहोचलो. माहितीपत्रकात दिल्याप्रमाणे कंबोडियातील ग्रामीण जीवन,भातशेती, तेथील बांबूंच्या आधारावर बांधलेली घरं जाताजाता पाहायला मिळाली.

अलेक्सने स्थानिक मार्गदर्शकाशी गाठ घालून दिली. त्याने त्या मंदिरसमूहाच्या बाहेर आम्हाला त्यासंदर्भातील माहिती दिली. ‘हे एकच मंदिर नसून हा काही छोटेखानी मंदिरांचा समूह आहे. हा मंदिर समूह कोणत्याही राजाने बांधलेला नसून, हर्षवर्धन पहिला या राजाचा नातू व राजेंद्रवर्मन दुसरा या राजाचा सल्लागार असलेल्या यज्ञवराह आणि राजाच्या दरबारातील विष्णुकुमार यांनी बांधला आहे. ‘त्रिभुवनमहेश्वर’ असं ह्याचं त्याकाळी नाव होतं आणि ह्या मंदिर समूहाच्या भोवताली ईश्वरपूर नावाचं नगर वसलं होतं. अंगकोर वाट सारखी भव्यता आपल्याला इथे दिसत नाही त्याचं कारण म्हणजे हा मंदिर समूह राजाने नव्हे तर दरबारी मंडळींनी बांधला असल्याने त्यांच्याकडे मंदिरबांधणीसाठीचा निधी कमी प्रमाणात उपलब्ध असावा. विस्मृतीत गेलेला हा मंदिरसमूह इ.स.१९१४ साली पुन्हा शोधला गेला.’

मार्गदर्शकाने आम्हाला मंदिरसंकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीन डोक्यांच्या ऐरावतावर आरूढ झालेला इंद्र दाखवला. प्रवेशद्वार सोडल्यास बाकीची तटबंदी आता अस्तित्वात नाही. आम्ही त्याच्याबरोबर प्रवेशद्वारातून आत शिरलो. तो सांगू लागला, ‘एकात एक अशा तीन आयताकृती रचना आपल्याला इथे आढळतात. काही मंदिरांची पडझड झाली असली तरी जे शिल्लक आहे ते अप्रतिम आहे. लाल सॅन्डस्टोनने ती बनवली आहेत. त्यातील काही शिवमंदिरं असून काही विष्णुमंदिरं आहेत.’ एकेका मंदिराशी थांबून तो त्याच्यावरच्या कोरीवकामाची माहिती देत होता. एका मंदिराच्या वरच्या बाजूस सुंद व उपसुंद असुर, तिलोत्तमा अप्सरेसाठी लढत असल्याचं दर्शवणारं पॅनेल त्याने दाखवलं. त्याच्या दुसऱ्या बाजूला ‘रावण कैलास पर्वत हलवताना’ ह्या आशयाचं पॅनेल होतं. त्यानंतर आम्ही मधल्या आयताकृती भागात प्रवेश केला. तिथे एका मंदिरावर ‘वाली व सुग्रीव युद्ध आणि त्यात रामाचा हस्तक्षेप’ दर्शवणारं पॅनेल दिसलं. मार्गदर्शकाने मग आम्हाला सर्वात आतील आयताकृती भागात नेलं. तेथील ग्रंथालय म्हणून संबोधल्या गेलेल्या एका इमारतीच्या भिंतीवर ‘उमा महेश्वर’ पॅनेल कोरलेलं होतं. दुसऱ्या इमारतीच्या भिंतीवर ‘खांडव वनदहनाचं’ अप्रतिम पॅनेल दृष्टीस पडलं. ‘नृसिंह हिरण्यकश्यपूचा वध करत असल्याचं पॅनेलही त्याने दाखवलं. मंदिरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी असल्याने, मंदिरं बाहेरूनच पाहता आली. बरीचशी पॅनेल आम्ही सहज ओळखत असल्याने मार्गदर्शकास आश्चर्य वाटत होतं. आम्हाला ह्या विषयात गती आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्यावर त्याला आम्ही हिंदू असून भारतात हे सर्व देव पुजले जात असल्याचं सांगून त्याची ज्ञानवृद्धी केली. तिथे मग हिंदू धर्म, त्यातल्या देवदेवता, पुराणं, भारतीय संस्कृती यावर एक छोटेखानी परिसंवाद पार पडला.

आमचा मार्गदर्शक अधून मधून ‘गुबरा’ असं कुणालातरी संबोधत होता. त्या मंदिरांच्या ललाटबिंबांवर कोरलेल्या देवांच्या ‘अ’कारांत नावांचा ‘इंद्रा’, ‘गणेशा’ असा ‘आ’कारांत उच्चार तो करत होता. दोन-तीन वेळा त्याचं ते ‘गुबरा’ ऐकल्यावर, तो ‘गुबरा’ नक्की कुठे आहे आणि कसा दिसतो ते आम्ही शोधू लागलो. गुबऱ्या गालाचा, सुखचिन्हं ल्यालेला तो देव अचानक उमगला. त्याच्या आकारावरून मला आणि माझ्या मुलीला एकदमच तो ‘कुबेर’ असल्याचं लक्षात आलं. आर्किमिडीज ‘युरेका, युरेका’ असं ओरडला असेल, त्याहुन मोठ्या आवाजात मी ‘कुबेराSS, कुबेर असं ओरडलो आणि तिथल्या शांततेचा भंग केला. आमचा मार्गदर्शक तर दचकलाच, शिवाय आजूबाजूचे इतर पर्यटकही गांगरले. माझ्यासाठी मात्र ते आर्किमिडीजच्या ‘युरेका,युरेका; सापडलं बरं का!’ असं गुबराचं गूढ उकललं होतं. माझ्यातला शिक्षक जागा झाला. मार्गदर्शकाकडून मी मग तो ‘कुबेर’ शब्द म्हणण्याचा सराव करून घेतला. मार्गदर्शकाला त्याची बिदागी आणि धन्यवाद दिले. उत्कृष्ट कोरीवकाम असलेला हा मंदिर समूह आमच्या कायमचा स्मरणात राहिला आहे.

 

हे मंदिर संकुल पाहताना आम्हाला त्याचं ओडिशामधील भुवनेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिराशी आकार व शैलीमध्ये साम्य असल्याचं सतत जाणवत होतं. विशेष म्हणजे दोन्ही मंदिरं दहाव्या शतकातीलच आहेत.

कंबोडियातील अंगकोर वाटच्या पर्यटनादरम्यान मुद्दाम एक वेगळा अर्धा दिवस तरी बनते स्राईसाठी राखून ठेवावा आणि सियाम रीपच्या जवळचं हे ‘आगळं वेगळं’ ठिकाण पाहण्याचा आनंद घ्यावा.

‘बनते स्राई’वर एक विस्तृत लेख मी माझ्या ‘कंबोडियातील अंगकोर वाट आणि परिसर’ या पुस्तकात समाविष्ट केला आहे; तरीदेखील त्याचं वेगळेपण लक्षात घेता, ‘आगळं वेगळं’ ह्या सदरामध्ये त्या ठिकाणाची दखल घेणं आवश्यक वाटलं आणि सदराच्या हेतुनुसार पुनर्लेखन केलं आहे.

डॉ. मिलिंद न. जोशी
      

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu