आगळं-वेगळं : आप्रवासी घाट,मॉरिशस  

“आपण आता ‘आप्रवासी घाट’ पाहायला जाऊया.” असं शैलँडने त्याच्या मॉरिशिअन फ्रेंच- क्रिओल(मॉरिशिअन बोलीभाषा)मिश्रित उच्चारात इंग्रजीतून आम्हाला सांगितलं. २४ ते २८ ऑक्टोबर २०१८, ह्या दरम्यान आम्ही मॉरिशसला फिरायला गेलो होतो. शैलँड गुन्नू हा माझा मॉरिशिअन विद्यार्थी. आम्ही त्याच्या गाडीतून पोर्ट लुईस ह्या मॉरिशसच्या राजधानीच्या शहरातून  ‘मार्गक्रमणा’ करत होतो. मार्गक्रमणा म्हणण्याचं कारण, पोर्ट लुईसच्या रस्त्यांवर मुंबई प्रमाणेच, ‘मेट्रो रेल्वे प्रकल्पा’च्या कामाने ‘अतिक्रमणा’ केली होती. त्यातून सुटलेल्या रस्त्यांवर एक दिशामार्गाचे फलक लावलेले असल्याने, दर्शविलेल्या एकाच दिशेने वाहनांचं मार्गक्रमण अतिधीम्या गतीने चाललं होतं. तरी सहसा कुठेही ‘हॉर्न’ वाजत नव्हते. शैलँडनेच सुचवलेलं हे ठिकाण, प्रवासीकंपन्यांच्या नेहेमीच्या यशस्वी, आकर्षक ठिकाणांहून वेगळं होतं. आमच्या आवडीची त्याला कल्पना असल्यामुळे, मौजमजेच्या ठिकाणांहून काही आगळं-वेगळं दाखवण्याचा त्याचा उद्देश होता. आधीच्या तीन दिवसात आम्ही स्वतंत्रपणे पश्चिम,उत्तर व दक्षिण मॉरिशसमधली  ठिकाणं पाहिली होती. उत्तर मॉरिशसच्या पर्यटनादरम्यान आम्ही पोर्ट लुईसला भेट दिली होती. पण त्यामध्ये आधी म्हटल्याप्रमाणे नेहेमीची यशस्वी ठिकाणंच दाखवली गेली होती.

शैलँडच्या उच्चारातून ते ठिकाण ‘प्रवासी घाट’ की ‘आप्रवासी घाट’ याबद्दल मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्याला पुन्हा तेच नाव विचारणं प्रशस्त वाटेना. शेवटी त्याच्या नकळत ‘गूगल सर्च’चा आधार घेतला आणि ‘आप्रवासी घाट’ म्हणजे ‘इमिग्रेशन डेपो’ असा नावाचा उलगडा झाला. त्या गच्च रहदारीतून ताशी पाच किमी पेक्षा कमी ‘वेगाने’ आम्ही चाललो होतो. दुपारचे पावणेबारा वाजले होते. शैलँड अधूनमधून ‘चक्’चे आवाज काढून नाराजी व्यक्त करू लागल्यावर मी त्याला त्या नाराजीचं कारण विचारलं. आप्रवासी घाट दुपारी बारा वाजता अभ्यागतांसाठी बंद होणार होता. त्यादिवशी शनिवार असल्यामुळे ‘हाफ डे वर्किंग’ होतं. प्रेक्षणीय स्थळं खरंतर ‘वर्किंग हाफ डे’ नंतरच गजबजण्याची शक्यता लक्षात घेऊन, उर्वरित ‘हाफ डे’ ‘वर्किंग’ असायला हवीत. असा विचार मांडून मी शैलँडची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पंधरा मिनिटांच्या आत आम्ही तिथे पोहोचणं आवश्यक होतं. एकदिशामार्गाच्या ‘व्यवस्थे’मुळे  समोर दिसू लागलेल्या ‘आप्रवासी घाटा’च्या प्रवेशद्वाराशी पोहोचण्यासाठी ‘घाट’ रस्त्यासारखं एक वळण उगीचच घ्यावं लागलं. शैलँडने वाहनतळावर गाडी लावली आणि आम्ही पळतपळत प्रवेशद्वाराशी धडकलो. पण प्रवेशद्वार  बंद होतं. नुकतेच बारा वाजले होते. ह्याबाबतीत मॉरिशिअन आपल्यासारखेच जागरूक असल्याचं लक्षात आलं. (कार्यालय सुरू होण्याची वेळ चुकली तरी जेवणाच्या व कार्यालय सुटण्याच्या वेळेबाबतीत अतिदक्षता घेतली जाते, तसं)


सुरक्षारक्षकाशी मग शैलँडने वाटाघाटी सुरू केल्या.  शैलँड त्याला  आम्ही भारतातून- मुंबईहून जणूकाही तो घाट पाहण्याचाच ‘घाट घालून’ आल्याचं पटवून देण्यात यशस्वी झाल्याचं,त्या दोघांच्या देहबोलीवरून व चेहेऱ्यांवरील बदलत चाललेल्या भावांवरून आम्ही ताडलं. ‘देहबोली’ जरी समजली तरी ते कोणत्या ‘बोलीत’ बोलत होते ते काही कळलं नाही. क्रिओल मध्ये बोलणं चाललं असावं अशी मी समजूत करून घेतली. त्या सुरक्षारक्षकाला मग दयेचा पाझर फुटल्याचं त्याने प्रवेशद्वार उघडल्यावर आमच्या लक्षात आलं आणि सस्मित चेहेऱ्याने आम्हाला ‘वेलकम’ म्हणून ‘अतिथी देवो भव’चा प्रत्यय दिला. आम्हाला आत घेऊन त्याने प्रवेशद्वार बंद केलं. शैलँड पुढे,नंतर तो रक्षक व त्यानंतर आम्ही अशी ‘टीम’ निघाली. आत शिरल्यावर त्या उग्र वाटणाऱ्या सुरक्षारक्षकाचं अतिशय सौम्य, आदबशीर मार्गदर्शकात झालेलं रूपांतर विस्मयकारक होतं. शैलँडच्या शब्दांनी तो बदल घडवला होता;निश्चित.

सुरक्षारक्षकाने आम्हाला प्रथम एक काचेची तावदानं असलेल्या एका कायमस्वरूपी  प्रदर्शनाच्या बाहेर उभं करून काचेतूनच आतील दिसतील तेव्हढेच ‘एक्झिबिट्स’ पाहायला सांगितले. ते दालन एव्हाना बंद झालं होतं. ते ‘इंटरप्रिटेशन सेंटर'(आकलन केंद्र)  होतं. काचेला नाक लावून आम्ही आमची नाकं चपटी होईपर्यंत, ते पाहून घेतलं. पहिल्याच थांब्यावर त्या मार्गदर्शकात परिवर्तित झालेल्या सुरक्षारक्षकाला नाराज करण्याची जोखीम आम्ही घेऊ इच्छित नव्हतो. त्यामुळे त्याचं मार्गदर्शनपर बोलणं संपेपर्यंत आम्ही काचेतून दिसणारं प्रदर्शन पहात राहिलो व नंतर आमची चपटी झालेली नाकं पाहून त्याच्या नकळत आपसात हसलो.

त्यानंतर त्याने आम्हाला आप्रवासी घाटाच्या एका इमारतीत नेलं व त्याविषयीची माहिती सांगायला सुरुवात केली. शैलँड दुभाष्याच्या भूमिकेत शिरला. सुरक्षारक्षकाने सुरुवात ‘क्रिओल’मध्ये केली असावी. फ्रेंच भाषासुद्धा आमच्यासाठी क्रिओल एव्हढ्याच अंतरावर असल्यामुळे तो फ्रेंचमध्येही माहिती देत असावा. त्याच्या त्या क्रिओल की फ्रेंचमधील माहितीचं इंग्रजीत भाषांतर करून शैलँड आम्हाला सांगू लागला. त्यात खूपच वेळ जाऊ लागला तरी काही काळ आपण कोणीतरी ‘मान्यवर’ असल्यासारखं जाणवलं. तेव्हढ्यात माझं बाजूलाच लावलेल्या माहितीफलकांकडे लक्ष गेलं. त्यावरील माहिती फ्रेंचबरोबरच इंग्रजीत देखील असल्यामुळे काम सुकर झालं. आम्ही ती माहिती वाचून काढली.

  
‘आप्रवासी घाट हे काही इमारतींचं संकुल आहे. भारतातून करारनाम्यावर मुख्यत्वे उसाच्या शेतात काम करण्यासाठी बोटीतून आणलेल्या मजुरांना उतरवून घेण्यासाठी, तसंच त्यांची तपासणी करण्याचं केंद्र म्हणून ते बांधण्यात आलं. इ.स.१८४९ ते १९२३ ह्या कालखंडात पाच लाखांहून जास्त भारतीय मजूर इथे प्रथमतः उतरले. तिथून त्यांना विविध ब्रिटिश वसाहतीत शेतमजूर म्हणून पाठवलं जात असे. इ.स.१८१०साली मॉरिशस फ्रेंचांकडून ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. इ.स.१८३४मध्ये गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आल्यावर, युरोपीय वसाहतींना आफ्रिकेतून मजूर मिळणं अशक्य झालं. ब्रिटिशांनी मग मॉरिशसमधील उसाच्या शेतीत काम करण्यासाठी भारतातून करारनाम्यावर शेतमजूर आणण्याचा निर्णय घेतला. ठराविक कालावधीसाठी मजूर म्हणून काम करण्याचं कंत्राट त्यांच्याशी केलं जात असे. इ.स.१८३४ ते १८४९ पर्यंत मजुरांना उतरवून घेण्यासाठी पोर्ट लुईस येथे खास व्यवस्था नव्हती. इ.स.१८४९ साली फ्रेंच काळापासून अस्तित्वात असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या एका इमारतीचं रूपांतर ‘इमिग्रेशन डेपो’ म्हणून करण्यात आलं. त्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये सतत वाढ करण्यात आली. एका वेळी एक हजार प्रस्तावित मजुरांची तपासणी करता येईल इतकी सुविधा तिथे निर्माण करण्यात आली. प्रस्तावित मजुरांच्या आरोग्य तपासणीच्यादृष्टीने व त्यांच्या परिगमनासाठी आवश्यक असलेले  बदल त्या संकुलात वेळोवेळी करण्यात आले. इ.स.१९१८ मध्ये संपूर्ण जगातच अशी कंत्राटी मजुरांची प्रथा बंद करण्यात आली. तरीसुद्धा इ.स.१९२३ पर्यंत हा ‘इमिग्रेशन डेपो’ कार्यरत होता. नंतर मात्र त्याची उपयुक्तता संपुष्टात आली, त्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा इमारतींचा वापर इतर कामांसाठी करण्यात येऊ लागला. इ.स.१९७० नंतर बसस्थानकाच्या बांधकामादरम्यान तसंच रस्त्यांच्या रुंदीकरणात त्यातील काही इमारती पाडण्यात आल्या. त्याच वर्षी भारताच्या तत्कालीन  पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मॉरिशस भेटीदरम्यान ह्या ठिकाणाला भेट दिली व त्यानंतर त्यातील उरलेल्या वास्तूचं संरक्षण व जतन करण्याची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने इ.स.१९८७साली त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला.  इ.स.१९९०साली त्याच्या संवर्धन व संरक्षणासाठी पुरातत्वीय दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले व त्याचं ‘आप्रवासी घाट’ असं नामकरण करण्यात आलं. इ.स.२००६ साली त्याला ‘युनेस्को’कडून ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता मिळाली. सध्या मूळच्या वास्तूतील फक्त पंधरा टक्के अवशेष शिल्लक आहेत.’ ही सर्व माहिती म्हणजे माहितीफलकावर दिलेली माहिती व शैलँड भाषांतर करून सांगत असलेल्या माहितीची बेरीज म्हणता येईल. ह्या माहिती संग्रहासाठी माझे डोळे मी माहितीफलकावर दिलेल्या माहिती वाचनात गुंतवले होते तर कान शैलँड भाषांतरित करत असलेल्या मौखिक माहितीसाठी त्याच्या दिशेने वळवले होते. अधूनमधून सुरक्षारक्षकांकडेही पहात होतो. हात कॅमेऱ्यावर सज्ज, असा अनेक अवधानं सांभाळत ज्ञानवृद्धी करून घेत होतो. 


तेव्हढ्यात तो सुरक्षारक्षक काही पायऱ्या उतरू लागला. त्याने आम्हाला त्याच्या मागून येण्यास सांगितलं. त्या चौदा दगडी पायऱ्या चढून स्थलांतरित प्रस्तावित मजूरांना बोटीतून उतरल्यावर इमिग्रेशन डेपोच्या दिशेने नेलं जात असे. आम्ही उलटी क्रिया करत होतो, त्यामुळे त्या पायऱ्या उतरून घाटावर पोहोचलो. तिथे त्या मजुरांच्या स्नानासाठी केलेली व्यवस्था त्याने आम्हाला दाखवली. तसंच त्यांच्या विश्रामासाठी व त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी उभारलेल्या दगडी भिंतींच्या बराकी आम्हाला पाहायला मिळाल्या. त्याशिवाय स्थलांतरित मजुरांसाठीचं स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, कर्मचाऱ्यांसाठीची व्यवस्था, तबेला, घोडा गाडी ठेवण्याची जागा अशी बरीच ठिकाणं एकामागून एक त्याने आम्हाला दाखवली.

आप्रवासी घाटाच्या बाह्य संरक्षक भिंतीला लागून आतल्या बाजूला दोन मध्यम उंचीच्या झाडांवर लटकवलेली, वेगवेगळ्या रंगांच्या कापडात बांधलेली गाठोडी आत शिरल्यापासूनच आमचं लक्ष  वेधून घेत होती. दोन दिवसांपूर्वी उत्तर मॉरिशसच्या पर्यटन स्थळदर्शनादरम्यान पोर्ट लुईसमधून जात असताना आम्हाला झाडांवर लटकवलेली रंगीबेरंगी गाठोडी रस्त्यावरून दिसली होती. तेव्हा ‘आप्रवासी घाट’ हे ठिकाण माहीत नसल्याने त्याबद्दल आम्ही आपसातच बोललो होतो. शैलँडच्या मार्फत आम्ही त्याबद्दल सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजूर आप्रवासी घाटावर थांबलेले असताना आपल्याबरोबर आणलेली बोचकी किंवा गाठोडी  त्यापद्धतीने झाडांवर लटकावून ठेवत. त्याची आठवण जपण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून ती गाठोडी लटकावली होती. एकंदर त्याकाळच्या आठवणी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिथे होताना दिसला. आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो. त्या सुरक्षारक्षकाला धन्यवाद दिले आणि तिथून निघालो.

मॉरिशसच्या इतिहासाच्या व समाजजीवनाच्या दृष्टीने आप्रवासी घाट ह्या स्थानाला अनन्यसाधारण महत्व आहे. आधी म्हटल्याप्रमाणे पाच लाखांहून जास्त, मूळचे भारतीय स्थलांतरित मॉरिशसमध्ये त्या कालखंडात आले. त्यामध्ये मुख्यत्वे उत्तरप्रदेश, बिहार तसंच महाराष्ट्र व तामिळनाडू ह्या राज्यांमधील स्थलांतरित होते.त्यामुळे मॉरिशसच्या लोकसंख्येत भारतीय वंशाच्या लोकांचं प्रमाण ६८ टक्के आहे. ‘आप्रवासी घाट’ हे भारतीय पद्धतीचं नाव त्याला दिलं गेलं. ‘आप्रवासी’ हे ‘इमिग्रेशन’चं भाषांतर व ‘घाट’ ह्या शब्दाची योजना जरी ‘डेपो’ साठी असली तरी त्याचा जास्त समर्पक अर्थ किनारा( घाट) असा आहे.  एकंदरच मॉरिशिअन अस्मितेचं आप्रवासी घाट हे एक द्योतक ठरतं. दर वर्षी २ नोव्हेंबर हा दिवस मॉरिशसमध्ये कंत्राटी स्थलांतरित मजुरांच्या मॉरिशसमधील आगमनाच्या स्मरणार्थ पाळला जातो.

मॉरिशस म्हणजे समुद्रकिनारे व त्यावरील मौजमजा असं एक समीकरण तयार झाल्यामुळे ‘आप्रवासी घाट’ सारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या वारसा स्थळाकडे पर्यटकांचं लक्ष वेधलं जात नाही. शैलँडच्या आग्रहामुळे व आम्हालाही अशी ‘हटके’ ठिकाणं पाहण्याची आवड असल्यामुळे ‘आप्रवासी घाट’ला भेट शक्य झाली.

मॉरिशसच्या पर्यटनादरम्यान स्वतंत्रपणे ‘आप्रवासी घाट’ला भेट देण्याचा प्रयत्न करावा व एक वेगळं जागतिक वारसा स्थळ पाहण्याचा आनंद घ्यावा.

डॉ. मिलिंद न. जोशी
संपर्क : ९८९२०७६०३१
milindn_joshi@yahoo.com          

Pc: google                              

 

 

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu