आगळं-वेगळं : क्यू गार्डन्स, लंडन

लंडनला जावं आणि पु. ल., रमेश मंत्री ह्यांनी वर्णन केलेली, तिथली प्रसिद्ध ठिकाणं पहावी, असं बरेच वर्षं मनात होतं. आम्हाला लंडन थोडं सवडीने पाहायचं होतं. इ.स.२००५च्या मे महिन्यात तो योग जुळून आला. आमचे मित्र मिलिंद काळे यांच्या घरी आमचं वास्तव्य होतं. मिलिंद व त्याची पत्नी नूतन यांनी आमचा अगत्यशील पाहुणचार केला. टॉवर ऑफ लंडन, टॉवर ब्रीज, सेंट पॉल्स कथीड्रल, बकिंगहॅम पॅलेस, ब्रिटिश पार्लमेंट, वेस्टमीनस्टर ऍबी, पिकॅडली सर्कस, ट्रॅफलगार स्वेअर, हाईड पार्क अशी लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणं पाहून झाली. विकेंडला मिलिंद कुटुंबीय आम्हाला शेक्सपिअरच्या गावाला; स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हनला घेऊन जाणार होते. तसंच जमलं तर ऑक्सफर्ड विद्यापीठाला धावती भेट देण्याचा माझा विचार मी बोलून दाखवला होता. मध्ये एक दिवस आमच्यासाठी मोकळा होता. मिलिंद व नूतनने आम्हाला ‘क्यू गार्डन्स’ ह्या ठिकाणाबद्दल माहिती दिली आणि तिथे जाण्याचं सुचवलं.

लंडन शहराचं मोठं वैभव म्हणजे प्रशस्त, संवर्धित केलेली उद्यानं. वर्षभर पडणारा भुरभुर पाऊस,आल्हाददायक थंड हवा व त्याचबरोबर मानवी इच्छाशक्ती; ह्यामुळे जगातील मोजक्याच महानगरांच्या वाट्यास आलेली हिरवाई लंडनला लाभली आहे. नऊ मोठी उद्यानं आणि लहानमोठे असंख्य बगीचे लंडन शहरात आहेत. ती लंडन शहराची फुफ्फुसं आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सेंट जेम्सेस पार्क, ग्रीन पार्क, हाईड पार्क, रीजंट्स पार्क ही उद्यानं लंडनच्या अगदी मध्यात आहेत. ह्याशिवाय क्यू गार्डन्स, केझिंग्टन गार्डन, रिचमंड पार्क, हॅम्टन कोर्ट व बुशी पार्क; मध्य लंडनपासून थोड्या अंतरावर आहेत.

क्यू गार्डन्स हे ठिकाणही वेगळ्या प्रकारचं. नेहेमीच्या लंडनदर्शनाच्या एक-दोन दिवसांच्या सहलीत हे ठिकाण समाविष्ट नसतं. ते एकतर मध्य लंडनपासून दूर आहे आणि किमान एक पूर्ण दिवस तरी त्याच्यासाठी राखून ठेवावा लागतो; इतका मोठा त्याचा विस्तार आहे.  तिथे जगातील विविध भौगोलिक प्रदेशांतील वनस्पतींचं, त्यांना आवश्यक असलेल्या वातावरणाची निर्मिती करून संवर्धन केलं गेलं आहे.
  

ब्रेकफास्ट करून मिलिंदच्या घराजवळच्या  व्हिटन रेल्वे स्थानकाकडे पायी निघालो. ‘मला आवडते वाट वळणाची’ ह्या काव्यपंक्तीची आठवण करून देणारी मिलिंदच्या घरापासून संपूर्ण रहिवासी वस्तीतील, पायी पंधरा मिनिटांची मार्गक्रमणा अतिशय आनंददायी होती. व्हिटनहून सरफेस ट्रेनने क्यू गार्डन्स रेल्वे स्थानकासाठी सिल्व्हर लिंक किंवा डिस्ट्रिक्ट रेल्वे लाईन घ्यावी लागते. क्यू गार्डन्स स्थानकात फारशी गर्दी नव्हती. स्थानकातून बाहेर आल्यावर समोरचा परिसर पाहून मुंबईतील हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी विभागांची आठवण झाली. रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग, ठराविक अंतरावरील मोठाल्या वृक्षांची रांग व त्यामागे दुमजली इमारती. रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यावर सरळ रस्त्याने पायी पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर क्यू गार्डन्सचं प्रवेशद्वार आहे. अर्थात ब्रिटिशांच्या पद्धतीप्रमाणे ठिकठिकाणी नकाशे, पाट्या, बाणखुणा असल्यामुळे कोणालाही न विचारता आम्ही क्यू गार्डन्सशी पोहोचलो. त्याच्या प्रवेशद्वारासमोर ‘क्यू’ गार्डन्स नाव सार्थ ठरवणारी पंधरा-वीस माणसांची ‘रांग’ बाजूच्या पदपथावर पसरली होती. आम्ही त्या रांगेत सामील झालो आणि सरकत सरकत प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. तिथे ‘क्यू गार्डन्स’ पहाण्यासाठीच्या तिकिटांचे पाउंडातले दर दिलेला फलक होता. जवळजवळ पाच पाउंड माणशी. मनातल्या मनात त्याचं रुपयांतर झालं. प्रवेश तिकिटं खरेदी केली. क्यू गार्डन्स मध्ये शिरलो. तिकिटांसोबत क्यू गार्डन्सचा नकाशा, अतिमहत्त्वाच्या ठिकाणांच्या थोडक्यात माहितीसह हातात पडला होता. त्यात खाण्यापिण्याच्या व खरेदीच्या ठिकाणांच्या माहितीचाही समावेश होता. 

क्यू गार्डन्समध्ये शिरलो आणि उजव्या बाजूच्या तळ्याकाठच्या हिरवळीवर भारतीय बैठक मारली. पाहण्याच्या ठिकाणांची व कुठून सुरवात करायची ह्यासंबंधीच्या मार्गदर्शनपर सुचनांचं सामुदायिक वाचन केलं. त्यातून हे एका भेटीत आणि थोडक्यात उरकण्याचं ठिकाण नव्हे ह्याचा अंदाज आला. तीनशे एकर परिसरात क्यू गार्डन्स पसरलेली आहे.

प्रथम डावीकडे समोर दिसत असलेलं विस्तीर्ण ‘ग्लास हाऊस’ पाहायला गेलो. इ.स.१८४४ ते १८४८ ह्या कालावधीत उभारलेल्या ह्या ग्लास हाऊसमध्ये वनस्पतींच्या अकराशेपेक्षा जास्त प्रजाती असल्याची माहिती माहितीपत्रकात दिली होती आणि एकोणीस मोठ्या टाक्यांमध्ये पाणवनस्पतींच्या विविध जाती संवर्धित करण्यात आल्या आहेत. ग्लास हाऊसमधली हवा उष्ण व दमट राखण्यात आली होती. आत नारळ, आंबा, केळी, जास्वंद इत्यादी आपल्याकडील वृक्षसंपदा दिमाखाने उभी होती. त्यामुळे ह्या झाडांच्या रांगांमधून फिरताना, युरोपातून आशिया खंडात नव्हे तर भारतात आल्याचा आभास निर्माण झाला. पाचच मिनिटात शरीरावर धारण केलेली थंडीविरोधी स्वेटर वगैरे आयुधं गळून पडली आणि मुंबईच्या आल्हाददायक हवेचा पुढील अर्धा-पाऊण तास आस्वाद घेता आला. जंगलाचा ‘टॉप व्ह्यू’ पाहण्यासाठी वरील बाजूस गॅलरी बांधलेली होती. तिथून पाहिल्यावर आपण खरोखरच एखाद्या घनदाट जंगलात असल्यासारखं वाटलं. 

ह्या ‘हॉट हाऊस’ मधून बाहेर आल्यावर, त्याच्या लगतच्या ‘वॉटर लिली हाऊस’ नावाच्या लहानशा हाऊसमध्ये शिरलो. आतली हवा ‘हॉट हाऊस’पेक्षा बरीच ‘कोल्ड’ होती. त्यामुळे थंडीविरोधी आयुधांनी शरीरावर परत आपापल्या जागा घेतल्या. तिथे तयार केलेल्या डबक्यात जवळजवळ दीड-दोन मीटर व्यास असलेल्या व जेवणाच्या थाळ्यांसारख्या कडा असलेल्या गोलाकार पानांमधून डोकावणाऱ्या सफेद, फिकट गुलाबी रंगांच्या वॉटर लिली पाहायला मिळाल्या. दोन माणसं मांडी घालून, समोरासमोर बसून गप्पा मारू शकतील इतकी ही पानं मोठी होती. पुढे बरंच पाहायचं शिल्लक असल्याने आम्ही ‘त्या’ गप्पांचा मोह टाळला आणि पानं एका मोठ्या संकटातून सुटली. वॉटर लिली हाऊसमधून बाहेर पडलो आणि युरोपात परतलो.

समोरच्या ‘रोझ गार्डन’ मधले गुलाबांचे असंख्य प्रकार पाहात ‘चेरी वॉक’ रस्त्याने ‘टेम्परेट हाऊस’ मध्ये शिरलो. आतलं तापमान ‘हॉट हाऊस’पेक्षा बरंच थंड पण बाहेरच्यापेक्षा उबदार असं जपान, चीन, कोरिया ह्या देशांमधील वनस्पतींसाठी अनुकूल राखण्यात आलं होतं. वनस्पतींच्या दिसण्यातला फरक लगेच लक्षात आला. शालेय भूगोलात शिकलेली माहिती आठवली. थोडया लहान आकाराच्या पानांच्या, सुचिपर्णी प्रकारातली बरीच झाडं आणि फुलझाडं पाहायला मिळाली. इथे एक फोटोसेशन झालं. इथे जगातील सर्वात उंच ‘इनडोअर’ झाड ‘चिलीअन वाईन पाम’ पाहायला मिळालं. इथे सुद्धा ‘जंगल टॉप व्ह्यू’साठी गॅलरी होती.

‘टेम्परेट हाऊस’च्या जवळच ‘इव्होल्यूशन हाऊस’ होतं. त्यात जीवसृष्टीची निर्मिती, तिचा विकास, वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींच्या निर्मितीचे व अस्तंगत होण्याचे टप्पे; हे सर्व दृक्श्राव्य पद्धतीने सांगितलं जात होतं. आपण ‘त्या त्या’ कालखंडात वावरत असल्याचा आभास निर्माण केला होता.

‘इव्होल्यूशन हाऊस’मधून बाहेर पडलो आणि नकाशात दर्शवलेला पॅगोडा पाहण्यासाठी बरीच पायपीट केली. पण त्याचा फायदा झाला. वाटेत बरेच वृक्ष त्यांच्या नाव, मूळ नाव, शास्त्रीय नाव वगैरे माहितीसह उभे होते. त्यांची माहिती वाचून ज्ञानार्जन करण्याचा निष्फळ प्रयत्न केला, पण एकाची माहिती वाचून पुढच्या वृक्षाजवळ गेल्यावर त्याची माहिती वाचता-वाचता आधीची माहिती विसरली जात होती. मग आधीचा वृक्ष काँगो खोऱ्यातला की अमेझॉनमधला ह्यावर निरर्थक वाद रंगू लागले. शेवटी एक ‘वट’हुकूम काढून मिसेसने ते माहितीवाचन थांबवलं आणि खरं नैसर्गिक सौंदर्य अनुभवता आलं.

ह्या माहिती जंजाळामुळे पंधरा मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास खर्ची पडला. पायही दुखू लागले होते आणि तेवढंच अंतर परत चालायचं असल्याने त्याचीही विवंचना होती. त्यामुळे समोर दिसणाऱ्या प्रत्येक वृक्षाला त्याच्या सौंदर्यासाठी,भलेपणासाठी प्रशस्तीपत्र बहाल करत पॅगोड्यात शिरलो आणि निराश झालो. पॅगोड्यात काहीच नव्हतं. कशासाठी एवढा आटापिटा केला, असं मनात आलं. पण त्यानिमित्ताने बरंच पाहता आलं. बाहेर आलो आणि परतीचा रस्ता धरला.

प्रवेशद्वाराशी आल्यावर एक साक्षात्कार झाला. ‘क्यू एक्सप्लोरर’ नावाच्या तीन डब्यांच्या आणि गडद हिरव्या रंगाच्या ‘बसराईड’चा थांबा दिसला. ही बस चाळीस मिनिटांच्या फेरीत क्यू गार्डन्सची फेरी पूर्ण करते. वाटेत आठ ठिकाणी थांबते. तिथला भाग पाहून परत पुढच्या बसने पुढे जाता येतं. त्यासाठी अर्थातच वेगळा दाम होता; साडेतीन पाउंड प्रत्येकी.

तळ्याच्या काठी पुन्हा बैठक मारली आणि मिळालेल्या माहितीपत्रकाच्या मागील बाजूवरील माहिती वाचून काढली. ‘वनस्पती संवर्धन आणि संशोधनाच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवर गणली गेलेली महत्त्वाची संस्था म्हणून क्यू गार्डन्सची ओळख आहे. ह्या संस्थेतर्फे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक दुर्मिळ वनस्पतींचं जतन व संवर्धन ह्या संदर्भात सल्ला दिला जातो. जगभर त्यांचे शास्त्रज्ञ आणि संशोधक कार्यरत असतात. जगातील बहुतेक सगळ्या वनस्पतींच्या प्रजातींचे नमुने असलेलं हर्बेरिअम, जॉड्रेल लॅबोरेटरी व अर्थशास्त्रीय वनस्पतिशास्त्राचं अद्ययावत केंद्र अशा तीन महत्त्वाच्या संस्था ह्या परिसरात आहेत. ‘वुलेमी पाईन’ नावाच्या फार पूर्वी नामशेष झाल्याचं समजलं गेलेल्या परंतु ऑस्ट्रेलियात आढळून आलेल्या वृक्षाचं क्यू गार्डन्सच्या सहकार्याने संवर्धन करण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. ह्या वृक्षाचं क्यू गार्डन्समध्ये यशस्वीरीत्या रोपण करण्यात आलं आहे.’ ह्या त्यांच्या वनस्पती संवर्धनाच्या धडपडीसाठी मदतीचे आवाहन करणारे फलक, मदतपेट्या ठिकठिकाणी लावलेल्या दिसल्या. क्यू गार्डन्सला ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणून जुलै २००३मध्ये मान्यता देण्यात आली आहे.

एक ‘आगळं वेगळं’ ठिकाण पाहिल्याचा आनंद मिळाला. घरी परतल्यावर मिलिंद व नूतनला त्यांच्या क्यू गार्डन्स पाहण्याच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद दिले.
लंडन मुक्कामात, शक्य असल्यास मुद्दामहून वेळ काढून क्यू गार्डन्सला भेट द्यावी आणि मानवनिर्मित निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा.

‘क्यू गार्डन्स’वर एक विस्तृत लेख मी माझ्या ‘प्रवासरंग’ पुस्तकात समाविष्ट केला आहे; तरीदेखील त्याचं वेगळेपण लक्षात घेता, ‘आगळं वेगळं’ ह्या सदरामध्ये त्या ठिकाणाची दखल घेणं आवश्यक वाटलं आणि सदराच्या हेतुनुसार पुनर्लेखन केलं आहे.

डॉ. मिलिंद न. जोशी
          

Pc: google       

 

One thought on “आगळं-वेगळं : क्यू गार्डन्स, लंडन

 • March 17, 2021 at 9:03 am
  Permalink

  डॉ. मिलिंद सर, आजचा आपला, हा प्रवास वर्णना वरील दुसरा लेख वाचला.
  अगदि साध्या- सरळ भाषेतील वर्णन मनाच्या जवळचे वाटले, उगाचच शब्दभांडाराचा कल्लोळ नाही अथवा कृत्रिम अलंकारिक भाषा नाही. आम्हा सामान्य जनाना अजून काय हवे हो?
  घरबसल्या लंडन ची सफर घडवून आणलीत ती सुद्धा बारीक बारीक तपशीला सह.
  लेख खूप आवडला.
  धन्यवाद
  आनंद ग मयेकर
  ठाणे

  द्धा

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu