शब्दवेध

शब्दांची आणि माझी नक्की केव्हापासून गट्टी जमत गेली ते मला आता आठवतसुद्धा नाही. वाचनाची आवड फार लहानपणी लागली. पुस्तकांमधून मराठी आणि पुढे इंग्रजी भाषा भेटत गेली तर घरातून कोकणीचे संस्कार होत गेले. मी लहान होते तेव्हा मला गोष्टी सांगणारी, माझ्याशी आवर्जून गप्पा मारणारी वडीलधारी मंडळी घरात खूप होती, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे माझ्यासाठी भरपूर वेळही होता. आजोबांच्या गोष्टीतून, केशरआत्याच्या गाण्यांमधून, माशायने बोलता बोलता सहज वापरलेल्या एखाद्या मार्मिक म्हणीतून मी भाषा शिकत गेले, शब्दांशी मैत्री करत गेले.

मासलेवाईक म्हणी आणि दाखले देण्यात गोव्याची कोकणी तशी फार समृद्ध, आणि त्यातून एकूणच आजीच्या पिढीतल्या बायकांच्या बोलण्यात म्हणींची, वोपारींची, वाक्प्रचारांची रेलचेल असायची. मला लहानपणी मुळीच धीर धरवत नसे, सगळंकाही ‘आत्ता’ झालं पाहिजे असा माझा अट्टाहास असायच्या. अश्या वेळी कुणीतरी हटकून म्हणायचं, ‘किते गो, ती भागुबायेली आबोली? आज रोयली, फाल्या फुलली’? (काय ग, ती काय भागुबाईची अबोली? आज लावली, उद्या फुलली’?) भटकायची आवड मला तेव्हाही होतीच, संध्याकाळी गाव हिंडून मी थकून भागून परत आले की शेरा ठरलेलाच, ‘आयली आमगेली, भोवती भागरथ!’. अजूनही ‘भोवती भागरथ’ हे विशेषण मला ऐकायला आवडतं! कधीकाळी मला आत्मचरित्र लिहिण्याची दुर्बुद्धी सुचलीच तर त्या पुस्तकाला नाव मी तेच देईन, ‘भोवती भागरथ’!

एस्किमोंच्या भाषेत म्हणे बर्फासाठी शंभर वेगवेगळी नावे आहेत. आमच्या गोव्यात मात्र ‘घाण वास’ ह्या गोष्टीला अनेक नावे आहेत. प्रत्येक पदार्थाची घाण वेगळ्या शब्दाने गौरवलेली. गोयंकार माणसाचे नाक भलतेच तीक्ष्ण असावे बहुधा. लहानपणी आई-आजी कधीही करपलेल्या दुधाच्या पातेल्याचा वास येतो वा घाण येते असं म्हणायच्या नाहीत. दुधाची येते ती बुट्टाणच! माश्यांची ती हिवळाण, कुसलेल्या पदार्थाला येते ती कुसटठाण, न धुतलेल्या, घामट कपड्यांना येते ती घामसाण, मुतारीच्या बाहेर येते ती खातसाण, आणि कुठल्याही नासलेल्या पदार्थाला जो आंबट भपकारा मारतो त्याला नाव आहे आंबसाण! ही सगळी शब्दांची श्रीमंती अनुभवतच मी लहानाची मोठी झाले. काही काही कोकणी शब्द तर मूळ संस्कृत किंवा पोर्तुगीझ शब्दांची पार बदलून गेलेली रूपे आहेत हे जेव्हा वाचलं तेव्हा गंमतच वाटली. ‘फकाण’ हा कोकणी शब्द गोव्यात दिवसातून पंचवीस वेळा ऐकू येतो, धांदरट, मूर्ख, इदरकल्याणी माणूस म्हणजे, ‘सामको फकाण मरे तो’! पण ‘फकाण’ हे ‘पाखंड’ ह्या संस्कृत शब्दाचं भ्रष्ट रूप आहे. तसाच आलमपेडड्यार हा शब्द. कुणी काही काम ना करता इकडे तिकडे दिशाहीन भटकताना दिसलं की गावातला एखादा वडीलधारा माणूस विचारायचाच, ‘आलमपेडड्यार’ सो कित्याक भोवता रे’? मला वाटायचं की आलमपेडड्यार म्हणजे कामधंदा नसलेला, बेकार माणूस. पण हा आलमपेडड्यार शब्द मूळ पोर्तुगीझ ‘आल्म पेर्दीद’, म्हणजे हरवलेला आत्मा असा आहे हे डॉ. सुखटणकरांच्या ‘मान्नी पूनव’ ह्या पुस्तकात वाचलं आणि हसायलाच आलं. डोळ्यांसमोर गावातले कितीतरी ‘आलमपेडड्यार’ लोक सहज तरळून गेले.

पुढे मराठी वाचत गेले, आणि भाषा माझ्याही नकळत बदलायला लागली. कितीतरी शब्द, वाक्प्रचार असे आहेत जे आपण त्यांचा मूळ अर्थ न कळताही सर्रास वापरत असतो. ‘दारिद्रय त्याच्या पाचवीलाच पुजलेले होते’, हे वाक्य शाळेत असताना निबंधातून मी कितीतरी वेळा लिहिले असेल, पाचवी पुजणे म्हणजे काय ह्याचा गंधही नसताना लिहिलेले. आजही आपण किती सहजपणे बोलून जातो, ‘आपल्या अठरापगड समाजात एकमेकांना समजून घ्यायची गरज आहे’ वगैरे, पगड्या आज आपण फक्त जुन्या सिनेमात आणि म्युझियम मध्येच बघतो तरीसुद्धा. भाषा अशीच घडत जाते. एकाच क्रियेला किती वेगवेगळे शब्द वापरतो आपण, सगळं संदर्भावर अवलंबून असतं. भात आपण चिवडतो, पण तांदूळ मात्र निवडतो आणि स्मशानातली राख फक्त सावडली जाते.

रंगांचंही तसंच. आपल्या भाषेत रंग कधीच एकेकटे येत नाहीत. प्रत्येक रंग एखाद्या विशेषणाचा हात धरूनच येतो, जोडीने नमस्काराला आल्यासारखा, आणि ते विशेषण संदर्भाप्रमाणे बदलतं. पंढरीचा विठोबा काळारोम असतो, एखाद्या सुंदर मुलीचे केस काळेभोर असतात, तर एखाद्या म्हाताऱ्याने लावलेला कलप मात्र काळाकुळकुळीत असतो. शरमेने आपला चेहेरा काळाठिक्कर पडतो. कुणाची म्हैस काळीढुस्स असते तर एखाद्या धनगराच्या मेंढराच्या पाठीवरची लोकर तेव्हढी काळीकरंद असते.

सरस्वतीचे श्वेतवस्त्र पांढरेशुभ्र असते पण भीतीने ग्रासलेला चेहेरा पांढराफटक पडतो, चांदणे पांढरेफेक असते. हाताची काकणं हिरवीकंच असतात, गवत हिरवंगार असतं, पण एखाद्या माणसाची नजर मात्र नुसतीच हिरवट असते. रक्ताचा रंग नेहेमीच लालभडक असतो, माणिक लालबुंद असतं आणि झेंडा लालजर्द असतो. हळद पिवळीधमक असते पण कावीळ झालेल्या माणसाचे डोळे पिवळेजर्द असतात. समुद्राचे पाणी निळेशार असते. शब्दांशी खेळता खेळता अश्या कितीतरी गोष्टी तुम्हाला उमगत जातात आणि तो जाणीवेचा क्षण अवचित हाती आलेल्या मोरपिसासारखा तुमचं मन हळुवारपणे कुरवाळून जातो.

साभार –  शेफाली वैद्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu