‘आगळं-वेगळं’ – ई एम ई टेम्पल, वडोदरा

‘सुखाच्या रात्री’ ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला लेखक रमेश मंत्री यांनी ‘प्रवास : का आणि कसा?’ याबद्दल विवेचन केलं आहे. प्रवास जरी वेगवेगळ्या कारणास्तव केला जात असला तरी पर्यंटनासाठीच्या मुद्दाम ठरवून केलेल्या प्रवासात तसंच इतर कारणांसाठी केलेल्या प्रवासातही अचानक एखादं प्रेक्षणीय ठिकाण आपल्या टप्प्यात असल्याचं समजतं आणि कमी कालावधीत त्याला भेट देणं शक्य असल्याचं आपल्या लक्षात येतं.
” अशा अचानक घडलेल्या भेटीचा आनंद काही वेगळाच असतो. बरं, निव्वळ ते ठिकाण पाहण्यासाठी परत त्या शहरात किंवा गावात येणं     सहज शक्य नसतं किंवा जिकिरीचं ठरू शकतं. एव्हढ्या लांब येऊन ते ठिकाण न पाहता परत जाणंही, पर्यटनाची आवड असलेल्या         व्यक्तीला जमण्यासारखं नसतं. अशाच आम्ही अनुभवलेल्या काही आगळ्यावेगळ्या ठिकाणांबद्दल लिहिण्याचा विचार मनात आला. अशा ठिकाणांचा परिचय वाचकांना करून देणं हा ह्या ‘आगळंवेगळं’ लेखमालेचा उद्देश आहे.”

ई एम ई टेम्पल, वडोदरा

एका पारिवारिक मित्रमंडळातील लग्नसमारंभासाठी वडोदऱ्याला गेलो होतो. मुंबईहून सकाळी साडेसहाच्या विमानाने वडोदऱ्याला साडेसातला पोहोचलो. दुपारी सव्वाचारच्या शताब्दी एक्सप्रेसचं वडोदऱ्याहून मुंबईसाठी आरक्षण केलं होतं. लग्नमुहूर्त दहाचा होता. साडेसात ते दहा या वेळात, ब्रेकफास्ट व आप्तेष्टांशी गप्पा दोन्ही पोटभर झाल्या होत्या. माझ्या मनात काळ, स्थळदर्शन(काम), वेगाचं गणित आकार घ्यायला लागलं. लग्न लागल्यावर ‘लक्ष्मीविलास पॅलेस’ हे वडोदऱ्यातलं स्थलदर्शनाच्या यादीतील पहिला क्रमांक टिकवून असलेलं, सर्वात महत्वाचं प्रेक्षणीय स्थळ पाहायचं आधीच ठरवलं होतं. दुपारी जेवण झाल्यावर चार वाजेपर्यंत, साधारण दोन तास हाताशी राहणार होते. अलकापुरीतील लग्नस्थळी नुसतंच बसून वेळ घालवण्यापेक्षा एखादं जवळचं ठिकाण पहाता येण्याची शक्यता अजमावण्यासाठी गूगल विद्यापीठात डोकावलो. लग्नस्थळापासून साडेचार किमी अंतरावरच्या ‘ई एम ई टेम्पल’ ह्या वेगळ्या नावाच्या आणि वेगळ्या संकल्पनेच्या स्थळाने लक्ष वेधून घेतलं व रिक्षाने वीस मिनिटांत ह्या ठिकाणी पोहोचणं शक्य असल्याचं लक्षात आलं.

लग्नमुहूर्त, नंतर लक्ष्मी विलास पॅलेस दर्शन, स्टेजवरचं फोटोसेशन, भोजन सर्व कार्यक्रम आखीव वेळापत्रकानुसार झाले. दुपारचे पाऊणेदोन झाले होते. यजमान मंडळींना आम्ही प्रस्थान ठेवत असल्याचं सांगितलं. हॉटेलमधून खाली आलो. ई एम ई टेम्पलसाठी एक रिक्षा ठरवली. वीस,पंचवीस मिनिटात आम्ही फतेहगंज विभागातील भारतीय सैन्यतळाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. पहाऱ्यावरील सैनिकाने रिक्षा थांबवून आमची चौकशी केली. आम्ही कुठून आलो, कशासाठी आलो आहोत ह्याबद्दल त्याने खात्री करून घेतली. त्याने रिक्षाचालकाकडे त्याच्या वाहन चालक परवान्याची मागणी केली व त्याने तो दाखवल्यावर, सैनिकाने तो स्वतःकडे ठेऊन घेतला. परतताना तो त्याला मिळणार होता. आमच्यापैकी एकाला त्याने रिक्षातून उतरून प्रवेशद्वाराबाजूच्या एका केबिनमध्ये पाठवलं. तिथे आधार कार्ड, वाहन चालक परवाना अशापैकी एखादं फोटो असलेलं ओळख पत्र पाहून त्याची नोंद केली जात होती. मी माझा वाहन चालक परवाना दाखवला. तो ठेऊन घेतला गेला व मला एक वेगळं ओळख पत्र दिलं गेलं. अशा कडक सुरक्षा तपासणीनंतर आमची रिक्षा प्रवेशदवारातून आत सोडण्यात आली. हा संपूर्ण परिसर भारतीय सैन्याच्या अखत्यारीत येतो. दोन, तीन मिनिटांत आम्ही ई एम ई टेम्पलच्या जवळ पोहोचलो. आम्ही रिक्षा तिथेच सोडली.

आवारात शिरताच, थोडया डावीकडे झाडीमधून एका वेगळ्या आकाराच्या व शैलीतील वास्तूने आमचं लक्ष वेधून घेतलं. त्या वास्तुकडे जाण्याच्या मार्गिकेवर दोन्ही बाजूस लहान कट्टयांवर सहाव्या शतकापासूनच्या देवदेवतांच्या व इतर दगडी मूर्ती बसवण्यात आलेल्या दिसल्या. मूर्तींच्या खाली त्यांचा कालखंड नोंदवला होता. त्यांचं अवलोकन करत आम्ही ई एम ई टेम्पलच्या वास्तुसमोर आलो. त्याचं बाह्य रूप नेहेमीच्या मंदिरापेक्षा वेगळं होतं. मंदिराच्या आत मोबाईल फोन वापराला बंदी असल्याची पाटी समोरच दिसली. मंदिराची माहिती समजण्यासाठी मंदिरापासून काही अंतरावर थांबलो आणि गूगल विद्यापीठाच्या ई एम ई टेम्पलची माहिती देणाऱ्या विकिपीडिया विभागात शिरलो आणि त्यावरील माहितीचं सार्वजनिक वाचन केलं. मंदिराचा इतिहास व त्याची संकल्पना समजण्यासाठी त्याचा उपयोग झाला. मंदिराच्या आवारातही मंदिराबद्दलची माहिती दिलेला माहितीफलक होता. त्यावरील माहितीही वाचून काढली.

‘ई एम ई टेम्पल किंवा दक्षिणमूर्ती टेम्पल हे शिवमंदिर असून १९६६ साली ते बांधण्यात आलं. एका वेगळ्या संकल्पनेवर आधारित हे मंदिर वास्तुस्थापत्यकलेचा एक वेगळा तसंच स्वतंत्र आविष्कार आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. संपूर्ण मंदिर बाहेरून अल्युमिनियमच्या पत्र्यांनी आच्छादलं आहे’.

‘ई एम ई टेम्पल हे नाव भारतीय सैन्याच्या “इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स कॉर्प्स” ह्या त्याच नावाच्या ई एम ई सैनिकी प्रशिक्षण शाळेच्या नावावरून देण्यात आलं आहे. त्याचा संपूर्ण आराखडा, रेखाटन व बांधणी तत्कालीन ख्रिस्ती लष्करी अधिकारी ब्रिगेडियर ए एफ यूजीन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला.. त्याचं दुसरं नाव ‘दक्षिणमूर्ती’ आहे कारण आधी म्हटल्याप्रमाणे हे शिवमंदिर असून शिवाची मूर्ती दक्षिणेकडे तोंड केलेली किंवा दक्षिणाभिमुख आहे. जगातील सहा धर्मांचा सुंदर मिलाफ या मंदिराच्या बांधणीत करण्यात आला आहे. हे मंदिर भारतातील ‘सर्वधर्मसमभावाचं’ प्रतीक आहे’.

‘मंदिराच्या सभामंडपाचं छत इस्लामी वास्तुशास्त्रानुसार घुमटाच्या आकाराचं आहे. त्यावर हिंदू देवळाच्या वर असतो तसा कलश आहे. दक्षिणमूर्ती शिवाच्या गाभाऱ्याच्यावर ख्रिस्ती संकल्पनेनुसार उंच मनोरा असून त्यावर बौद्ध पॅगोड्याप्रमाणे निमुळता होत गेलेला सोनेरी कळस आहे. मंदिराचं प्रवेशद्वार जैन संकल्पनेनुरूप कमानीच्या आकाराचं आहे तर पारशी परंपरेनुसार मंदिरात अग्नी प्रज्वलित करण्यात आला आहे’. एव्हढी माहिती वाचल्यावर आम्ही प्रथम बाहेरून मंदिराचं अवलोकन केलं व वाचलेल्या माहितीनुसार इस्लामी, हिंदू, ख्रिस्ती व बौद्ध संकल्पना समजावून घेतल्या. दिलेल्या सूचनेनुसार मोबाईल फोन बंद केला आणि जैन कमानीतून मंदिरात शिरलो. आत गाभाऱ्यात असलेल्या काळ्या पाषाणात घडवलेल्या सुंदर शिवमूर्तीचं दर्शन घेतलं. त्याच्या समोर शिवलिंग होतं व पुढे नंदी होता. शिवमूर्तीच्या मागे ‘ओम नमः शिवाय’ कोरलेली चांदीची कमान होती. एका बाजूला महाबलीपुरमहून आणलेली गणपतीची मूर्ती होती. बाजूला पारशी परंपरेनुसार अग्नी होता. त्या गोलाकार सभामंडपात थोडा वेळ थांबलो. अतिशय प्रसन्न वाटलं. पश्चिमेकडील द्वारातून मंदिराबाहेर आलो.

मुख्य मंदिराच्या आवारात इतर देवदेवतांची लहान मंदिरं आहेत तसेच साईबाबांचं मंदिरही आहे. अमरनाथ गुंफेची प्रतिकृती करण्यात आली आहे. त्या सर्व देवतांचं दर्शन घेतलं. त्या संपूर्ण परिसरात भरपूर झाडी आहे. वडाचे प्रचंड बुंधे असलेले व भरपूर पारंब्या असलेले अनेक वृक्ष तिथे दिसले. एकंदरच वडोदऱ्यामध्ये वडाचे मोठाले वृक्ष जागोजागी दिसतात, त्यावरूनच त्याला ‘वडोदरा’ नाव पडलं असावं, अशी शंका मला आली.

आमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळात एक वेगळं, उत्तम ठिकाण आम्ही पाहिलं. मंदिर रविवार सोडून इतर सर्व दिवशी सकाळी साडेसहा ते रात्री साडेआठपर्यंत, दर्शनासाठी उघडं असतं. मंदिरप्रवेश निःशुल्क आहे.

अतिशय शांत, निसर्गरम्य, प्रसन्न वातावरणात तिथे निवांत क्षण अनुभवून, ताजंतवानं होऊन आम्ही मंदिराबाहेर पडलो. न विसरता माझा वाहन चालक परवाना ताब्यात घेतला आणि रिक्षाने पंधरा मिनिटात, साडेतीन वाजता वडोदरा रेल्वे स्थानकात मुंबईला परतण्यासाठी पोहोचलो.


डॉ. मिलिंद न. जोशी

संपर्क : ९८९२०७६०३१
milindn_joshi@yahoo.com

 
 
  PC : Google.

One thought on “‘आगळं-वेगळं’ – ई एम ई टेम्पल, वडोदरा

  • April 19, 2020 at 4:44 pm
    Permalink

    खूपच वैशिष्ट्यपूर्ण दिसतं आहे हे मंदिर. सुटसुटीत व सुंदर वर्णन केले आहे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu