संस्कार

संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे…यादी नक्कीच लांबत जाईल. पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार ही काही दैवी देणगी किंवा रेडिमेड पॅकेज म्हणून उपलब्ध होणारी गोष्ट नाही. संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा मागच्या शतकात साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’ रूपाने लिहून ठेवला आहे. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आपल्या आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. रूढ अर्थाने हे लिखाण काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. त्या आहेत सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या. १९५३ साली प्र.के.अत्र्यांनी ह्या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा नायक श्याम होता माधव वझे आणि आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार अर्थातच वनमाला. चित्रपट जरी १५३ मिनिटांचा असला तरी एकदा पाहिलेल्या ह्या चित्रपटाचा ‘इम्पॅक्ट’ (परिणाम) मात्र आयुष्यभर राहतो……

अंघोळ झाल्यावर श्याम आईला पाय पुसायला सांगतो. त्यावेळी आई म्हणते ”श्याम जसे पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जपत जा. मनाची शुध्दी करण्याकरिता देवाने अश्रूंचे दोन हौद भरून दिले आहे”. भजनाची आवड असलेला श्याम जेव्हा बुवांना चिडविण्यासाठी मोठयाने भजन म्हणतो तेव्हा आई त्याला म्हणते, ”देवाची भक्ती ही मोठयाने नाही तर ह्दयातून केली तर देवा पर्यंत पोहोचते.” बंधू प्रेमाचे धडे ‘चिंधीच्या’ गाण्यातून समजावून सांगणारी आई, पोहायला जात नाही म्हणून श्यामच्या पाठीवर चाबकाचे फटके ओढणारी आई, श्यामला कळया न तोडू देणारी आई, महार असलेल्या म्हातारीला मोळी उचलून मानवतेचे धडे देणारी आई, गरीबीतही ताठ मानेने जगणारी आई, आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून कष्ट करणारी श्यामची आई…..अशी अनंत रूपे साने गुरूजींनी ४५ भागात लिहून काढली आहेत. तितक्याच प्रभावीपणे आचार्य अत्र्यांनी पडद्यावर उभी केली आहेत. चित्रपटाने १९५३ सालचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रीय पुरस्कार १९५४ साली सुरू झाले त्यामुळे त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारही ‘श्यामची आई’ला मिळाला.

श्यामची आई या पुस्तकातील एक एक गोष्टी या लेखनमालेद्वारे आपणा पर्यंत पोहोचवणार आहोत. जेणेकरून ही संस्कारांची शिदोरी आपल्या पुढच्या पिढीकडे जायला आणि हे संस्कार त्यांच्या मनात रुजून चांगल्या व्यक्ती घडायला नक्कीच मदत होईल!

गोष्ट पहिली  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu