आगळं-वेगळं – अंजनेरी मंदिरं

आगळं-वेगळं – अंजनेरी मंदिरं

‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखलं जाणारं ‘नाशिक’ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात व भारताबाहेरही धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गोदावरी नदी, तिच्या घाटाजवळची काळाराम व इतर मंदिरं, पंचवटी तसंच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर देवस्थान ह्या सर्वांमुळे नाशिकला धार्मिक स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. बरेचसे पर्यटक ह्या ठिकाणांना भेट देतात. त्याशिवायही तिथे बरीच ठिकाणं एकदा तरी भेट द्यावी अशी आहेत.

नाशिकपासून बावीस किमी अंतरावर नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर डावीकडे अंजनेरी गाव आहे. अंजनेरी नावाच्याच डोंगराच्या पायथ्याशी हे गाव वसलेलं आहे. त्र्यंबकेश्वरपासून जवळ म्हणजे तीन किमी अंतरावर अंजनेरी गाव आहे. हे गाव हनुमानाचं जन्मस्थान असल्याचं मानलं जातं आणि त्याच्या आईच्या ‘अंजनी’च्या नावावरून ह्या गावाचं नाव अंजनेरी झाल्याचा प्रवाद आहे.

नाशिकहून आपण त्र्यंबकेश्वरकडे निघालो की आपल्याला अंजनेरी गावाच्या थोडं आधी डाव्या बाजूस न्यूमिस्मॅटिक(नाणेविषयक) संस्था लागते. तिथून पुढे एखाद किमीवर डावीकडे अंजनेरी गाव लागतं.

इतिहास व पुरातत्त्वशास्त्र हे माझ्या मुलीच्या आवडीचे तसंच अभ्यासाचे विषय. काही वर्षांपूर्वी तिला नाशिक जवळची ठराविक ठिकाणं पहायची होती. आम्हालाही अशा भटकंतीची आवड असल्याने आम्हीसुद्धा तयार झालो. बऱ्याच वर्षात आम्ही नाशिकला गेलो नव्हतो. तिलाच तिच्या अभ्यासाच्या दृष्टीने योग्य अशी ठिकाणं व त्यासाठीचा मार्ग यांची आखणी करायला सांगितली. मुंबईहून नाशिकला पोहोचायच्या थोडं आधी लागणाऱ्या पांडवलेणी, न्यूमिस्मॅटिक(नाणेविषयक) संस्था (ज्याविषयीची माहिती आपण एका पुढील लेखात घेणार आहोत) व अंजनेरीची मंदिरं अशी तीन ठिकाणं तिने निश्चित केली. त्यापैकी पांडवलेणी जरी पाहिल्या नसल्या तरी त्याबद्दल मी ऐकून होतो. इतर दोन ठिकाणांची नावंसुद्धा मी ऐकली नव्हती.

मुंबईहून सकाळी लवकर निघून प्रथम पावणेदहाच्या सुमारास पांडवलेणींजवळ पोहोचलो. पांडवलेणी पाहून सव्वाअकराच्या सुमारास अंबड सातपूर जोड रस्त्याने त्र्यंबकेश्वर रस्त्याला लागलो. साधारण पावणेबाराला आम्ही न्यूमिस्मॅटिक(नाणेविषयक) संस्थेत पोहोचलो. त्या संस्थेच्या विषयीची माहिती आधी म्हटल्याप्रमाणे आपण एका पुढील लेखात घेणारच आहोत. तिथून निघाल्यावर एका साध्याशा धाब्यावर थोडी पोटपूजा केली. त्र्यंबकेश्वरच्या दिशेला न्यूमिस्मॅटिक(नाणेविषयक) संस्थेपासून एक किमी अंतरावर डाव्या बाजूला अंजनेरी गावाच्या नावाचा फलक दिसला. त्या रस्त्याने पाचच मिनिटात अंजनेरी गावात पोहोचलो आणि आपण वेगळ्या कालखंडाची साक्ष देणाऱ्या ठिकाणी आलो असल्याचा प्रत्यय आला. अंजनेरीच्या डोंगराखालच्या सपाट,विस्तृत प्रदेशात पसरलेली अनेक मंदिरं किंवा मंदिरांचे अवशेष आम्हाला पाहायला मिळाले.


एके काळचा वैभवशाली इतिहास आम्हाला भग्न मंदिरांच्या रुपात रस्त्याच्या दोन्ही बाजूस दिसत होता. आम्ही गाडीतून उतरलो आणि पायीच तो सर्व परिसर पाहण्याचं ठरवलं. आमच्या मुलीने आधी त्याचा थोडाफार अभ्यास केलेला असल्यामुळे, ती आम्हाला वेळोवेळी त्या मंदिरांबद्दल माहिती देत होती. एकूण सोळा मंदिरं तिथे पाहायला मिळतील, ज्यापैकी बारा जैन, तर चार हिंदू मंदिरं आहेत; अशी माहिती तिला समजली होती. खरं तर मंदिरांची संख्या त्याहून बरीच जास्त दिसत होती. बरीचशी मंदिरं ढासळलेल्या स्थितीत होती. सात आठ मंदिरंच बऱ्या स्थितीत दिसत होती. त्यांच्यापैकी तीन जैन मंदिरं एकाच आवारात होती. चार मंदिरं वैष्णव व शैव संप्रदायाची होती. त्यांच्या बांधकामाची शैलीही एकसारखी दिसत नव्हती. बऱ्याचशा मंदिरांची शिखरं नागर शैलीतील तर विष्णू मंदिराचं शिखर भूमिज शैलीतील होतं. काही मंदिरांवर बाहेरच्या बाजूस कोरीवकाम केलेलं दिसत होतं तर काही मंदिरांचा बाह्यभाग कोरीवकाम नसलेला, मोकळा दिसला. त्यांचा कालखंड ठरवताना तिथे सापडलेला शिलालेख व मंदिरांच्या शैलीतून माहिती घ्यावी लागते. तेथील एका पडक्या मंदिराच्या भिंतीमध्ये संस्कृत भाषेतील एक शिलालेख आहे. अशी माहिती तिच्या वाचनात होती व शक्य झाल्यास तो पाहण्याचं आम्ही ठरवलं होतं.

जैन मंदिर समूहातील एका मंदिरात आम्हाला तो शिलालेख पाहायला मिळाला. शिलालेखात शके १०६३ असा उल्लेख आहे म्हणजे तो शिलालेख इ.स. ११४१चा आहे. जैनांचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभ यांच्या मंदिराच्या देखभालीसाठी सेउनचंद्र याने केलेल्या व्यवस्थेसंदर्भातील माहिती त्यात दिली होती. त्यावरून काही मंदिरं बाराव्या शतकातील यादवकालीन असल्याची माहिती तिने दिली. तरी देखील तेथील इतर काही मंदिरं आधीच्या कालखंडातली असावीत असा अंदाज त्यांच्या शैलीवरून व्यक्त होतो, असं मत तिने व्यक्त केलं. तिने तिथल्या स्थानिक गावकऱ्यांना देखील त्या मंदिरांबद्दल माहिती विचारली. त्यांच्या समजूतीनुसार अंजनेरीमध्ये पूर्वी १०८ मंदिरं अस्तित्वात होती. अर्थात आपल्याकडे १०८ आकड्याला असलेलं एक वेगळं वलय लक्षात घेता, १०८ जरी नसली तरी आत्ता दिसतात त्यापेक्षा बरीच जास्त मंदिरं पूर्वी असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कुठेही व्यवस्थित माहिती देणारे फलक नसल्याने थोडी पंचाईतच झाली. बऱ्याच मंदिरांभोवती केंद्रीय पुरातत्त्व खात्याने संरक्षक कुंपण घातल्यामुळे आम्हाला मंदिरांपर्यंत जाता आलं नाही. त्या मंदिरांतील भग्नावशेषांच्या संरक्षणासाठी कुंपणाची निश्चितच आवश्यकता आहे तसंच धोकादायक स्थितीतील मंदिरांजवळ जाण्यास लोकांना मज्जाव करण्याचा हेतू देखील त्यात असावा.

ढासळलेल्या मंदिरातील काही मूर्ती रस्त्याच्या कडेला पडलेल्या पाहून मन विषण्ण झालं. त्यामध्ये एक जैन तीर्थंकराची पद्मासनातली मूर्ती दिसली. जैन मंदिर समूहाच्या मागच्या बाजूला आम्हाला एका मंदिरावर सफेद ध्वज लावलेले दिसले. आम्ही त्या मंदिराशी पोहोचलो आणि काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान मिळालं. ते महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांच्या बैठकीचं स्थान होतं. लुंगी नेसलेले एक वृद्ध तसंच एक श्वेतवस्त्र परिधान केलेली प्रौढ स्री तिथे आम्हाला भेटले. त्यांच्याकडूनही थोडीफार माहिती मिळाली. तिथे चक्रधरस्वामी येऊन गेले होते. त्यांच्या बैठकीचं आम्ही दर्शन घेतलं.

अंजनेरी गावाच्या फाट्यावरून आत येईपर्यंतही एका पुरातन कालखंडाचं गतवैभव आपल्याला पाहायला मिळणार आहे, असं वाटलं नव्हतं. कालौघात जरी येथील मंदिरांची पडझड झालेली असली तरी आपल्याला त्या काळचं वास्तुस्थापत्यशास्त्र किती प्रगत होतं ह्याची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. गेले दीड दोन तास ‘टाइम मशीन’शिवाय नऊ शतकं मागे भ्रमंती झाली होती. अंजनेरी गावातून बाहेर आलो; त्र्यंबकेश्वर – नाशिक रस्त्यावर येऊन परत एकविसाव्या शतकाच्या कोलाहलात सामील झालो.

नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाताना किंवा परत येताना थोडी वाकडी वाट करून व थोडा वेळ हाताशी ठेऊन अंजनेरी गावातली ही मंदिरं पाहण्याचा आनंद घ्यायला हवा.

डॉ. मिलिंद न. जोशी
संपर्क : ९८९२०७६०३१
milindn_joshi@yahoo.com
 
 
  PC : Google.

2 thoughts on “आगळं-वेगळं – अंजनेरी मंदिरं

 • April 2, 2020 at 4:37 am
  Permalink

  अभ्यासपूर्ण आणि छान माहिती दिली आहे.

  Reply
 • April 2, 2020 at 5:21 am
  Permalink

  खुपच छान. साधी सरळ भाषा. I need to visit this place for sure

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu