आला आला उन्हाळा ….

आजीचा बटवा -उन्हाळ्यात उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत वाढत चालला आहे.त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी अबालवृद्धांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.आपल्या घरात, आसपास असणाऱ्या सर्व नैसर्गिक गोष्टींमधे काही ना काही औषधी गुण असतात. यांची योग्य योजना करता आली तर ते घरगुती उपचारच होत. सध्या चे दिवस आहेत उन्हाळ्याचे. उष्णतेने शरीरातील पित्तदोष वाढणे स्वाभाविक असते. अशावेळी करता येण्यासारखे घरगुती उपचार खास तुमच्यासाठी …

1. उन्हाळ्यात पाणी पिऊनही समाधान होत नाही, ओठ, घसा कोरडे पडतात, हातापायाच्या तळव्यांची आग होते, अशावेळी साधारण एक लिटर पाण्यात दोन सुके अंजीर, मुठभर मनुका आणि दोन चमचे धने घालून हे सर्व मिश्रण रात्रभर माठात ठेवावे. सकाळी रवीने घुसळून, गाळून पुन्हा माठात ठेवावे. दिवसभरात हे पाणी थोडे थोडे प्यायल्यास ऊन्हाळ्याचे त्रास कमी होतात. ऊन्हाळ्यामधे थकल्यासारखे वाटते तेही कमी होते.

2. उन्हाळ्यामधे द्राक्षे मिळतात. द्राक्षांचा रस हा उन्हाळ्यातील ऊष्णता कमी करण्यासाठी उत्कृष्ट असतो. द्राक्षाच्या रसात चिमुटभर जीरेपुड आणि चिमुटभर बडिशेपेची पूड टाकुन प्यायले असता उन्हाळ्यातील उष्णतेमुळे क्षीण झालेला रसधातु पुन्हा टवटवीत होतो. द्राक्षे वार्याने थंड असल्याने अंगाचा दाह, मूत्राचा दाह वगैरे लक्षणे कमी होतात.

3. बऱ्याच व्यक्‍तींना उन्हाळ्यात डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे वगैरे त्रास होतात. संगणकावर वा प्रखर प्रकाशात काम करणाऱ्यांना तर उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवणे उत्तम असते. शुद्ध गुलाबपाण्याच्या किंवा न तापवलेल्या कच्च्या, थंड किंवा तापवून गाळून घेतलेल्या दुधाच्या घड्या ठेवण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो.

4. उन्हाळ्यात लहान मुलांना घामोळे येताना दिसते, यावर खरबूजाचा गर लावण्याचा उपयोग होतो.

5. उष्णता वाढल्याने तळपायांची जळजळ होत असल्यास दुधीचा कच्चा कीस बांधून ठेवण्याचा तसेच दूर्वांच्या लॉनवर अनवाणी चालण्याचा उपयोग होतो.

6. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्यक्ष उन्हात जाण्याचे टाळणेच हितकर असते. पण उन्हात जावे लागलेच तर उन्हाचा त्वचेवर परिणाम होऊ नये, त्वचा काळवंडू नये यासाठी चेहरा, हात वगैरे उन्हाचा संपर्क आलेल्या ठिकाणी घरचे ताजे लोणी चोळणे उत्तम असते.

7. उन्हाळ्यात लघवी करताना आग होणे, लघवीचा रंग गडद होणे वगैरे लक्षणे असल्यास कपभर दुधात अर्धा चमचा चंदनाचे गंध व चवीनुसार खडीसाखर मिसळून घेतल्यास लघवीला साफ होऊन बरे वाटते.

9. उष्णता बाधू नये म्हणून उन्हाळ्यात शीतल द्रव्याची उटणी लावावीत असे आयुर्वेदात सुचविले आहे. अनंतमूळ, वाळा, चंदन, ज्येष्ठमध वगैरे शीतल, सुगंधी व वर्णात हितकर द्रव्यांचे चूर्ण व मुगाच्या डाळीचे पीठ यापासून तयार केलेल्या उटणे लावून स्नान करणे उन्हाळ्यात उत्तम होय.

PC:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu