वसुबारस

भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. अंधारावर मात करून सारा परिसर प्रकाशमान करणाऱ्या दिवाळीची महाराष्ट्रात सुरुवात होते ती आश्‍विन वद्य द्वादशीस सुरवात होते. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस त्याला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस असेही म्हटले जाते. सवत्सधेनूची पूजा करण्याचा हा दिवस. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साऱ्या देवांची वस्ती गोमातेच्या शरीरात असते, अशी श्रद्धा आहे. अशी कथा सांगितली जाते की समुद्रमंथनातून ज्या चिजा निघाल्या, त्यामध्ये पाच कामधेनू होत्या. कामधेनू म्हणजे व्यक्त केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी गोमाता. खरे तर गाय आणि तिच्यापासून जन्माला येणारे बैल यांच्या जिवावरच प्राचीन काळी शेतीची मदार होती. त्यामुळे गाईची पूजा होणे स्वाभाविकच आहे. क्षीरसागराच्या मंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या पाच कामधेनू जन्माला आल्या.

 

या पाच गायी जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, अगस्ति आणि गौतम या ऋषींना देण्यात आल्या. या कामधेनूंच्या दूध, गोमूत्र, गोमयापासून बेलाचे झाड, गुग्गुळ या चिजांचा जन्म झाला. गायीच्या धृतापासून म्हणजेच तुपापासून अमृतच तयार होते. या साऱ्याचा संबंध आजच्या काळात शेणाचे होणारे जैविक खत, आरोग्य वाढविणारे गायीचे कमी फॅटचे दूध, आयुर्वेदाचार्यांना उपचारासाठी प्रिय असणारे धृत या साऱ्यांशी जोडता येईल. प्राचीन काळी पृथू राजा राज्य करीत असताना पृथ्वीवर नैसर्गिक संकट आले तेव्हा त्याने गोमातेचेच पूजन केले. मग संकटात सापडलेली सृष्टी पुन्हा नवजीवनाने तरारली. तोच हा द्वादशीचा दिवस. वसुबारसेला गायीला नैवेद्य तर दाखवितातच; पण काही ठिकाणी तिला सर्जनाचे, मातृत्वाचे प्रतीक म्हणून साडी चोळी नेसवतात. पूजेच्या वेळी जी रांगोळी काढण्याची प्रथा आहे त्यामध्ये “गोपद्म’ म्हणजे गायीची पावले काढण्याची प्रथा आहे. म्हणजेच भारतीयांनी गायीला गोठ्यातून थेट देव्हाऱ्यापर्यंत आणून ठेवले आहे. या साऱ्याचे स्मरण देते ती वसुबारस.

हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशी वृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.

या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.

ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक गंमतशीर माहिती अशी सांगितली जाते की, दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढ होते. हे टाळण्यासाठी म्हणून १०० कोटी देव जिच्यात सामावले आहेत अशी ही आपली गाऊमाताचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभु प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी उपासना आहे.

तिन्हीसांजेला गायीला ओवाळून, तिला चारा घालून करंजीचा नैवेद्य दाखवून गायीची वासरासह पूजा केली जाते. सध्या शहरातील गोठे महापालिका हद्दीबाहेर गेल्यामुळे सुवासिनींना जवळपास सवत्सधेनूचे पूजन करणे अशक्‍य झाले आहे. हे ध्यानात घेऊन विविध स्वयंसेवी संस्था-संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत ठिकठिकाणी सवत्सधेनू पूजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

– संकलित

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu