नाम

मराठी व्याकरण या भागात आपण मराठी व्याकरणातील विविध भागांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपणास अधिक माहिती आमच्याबरोबर शेअर करायची असल्यास आम्हास thinkmarathi@gmail.com या मेल आयडी वर पाठवा आम्ही ती सर्वांसाठी नक्की उपलब्ध करून देऊ.
नाम:

दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या , सजीव किंवा निर्जीव , खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला किंवा वास्तूच्या गुणधर्माला जी नवे दिली जातात , त्यांना नाम असे म्हणतात. जगातील माणसे , निसर्गातील वस्तू , पदार्थ , प्राणी पक्षी , काल्पनिक वस्तू या सर्वाना किंवा त्यांच्या गुणधर्माना जी नवे दिली आहेत , ती नामे आहेत.सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय.

उदा: पेन, कागद, राग, सौंदर्य, स्वर्ग इ.

नामाचे तीन प्रकार आहेत

१)सामान्य नाम :

२)विशेष नाम:

३)भाववाचक नाम

१)सामान्य नाम :

एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मा मुळे जे एकाच नाम दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ म्हणतात.
सामान्य नाम त्या जातीतील प्रयेक घटकासाठी वापरले जाते. सामान्य नामाचे अनेकवचन होते.
उदा: घर, मुलगी, ग्रह, तर, खेळाडू, माणूस, इत्यादी.

सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात:
अ)पदार्थ वाचक नाम:
जे घटक शक्यतो लिटर, मीटर, किंवा, कि.ग्रॅम मध्ये मोजले जातात/ संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला पदार्थ वाचक नाम म्हणतात.
उदा: तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने इ.

ब) समुह वाचक नाम:
समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात.
उदा:मोळी, जुडी, ढिगारा, गंज इ.

२)विशेषनाम:

एखाद्या नामातून एका विशिष्ठ व्यक्तीचा , प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास ‘विशेषनाम’ म्हणतात.

ते फक्त एका घटका पुरते मर्यादित असते. विशेषनाम एकवचनी असते.
उदा: गोदावरी, रमेश, ताजमहाल, सुर्य, चंद्र इ.
टीप: विशेष नाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते.

उदा: निखिल-(व्यक्तिवाचक), मुलगा (जातीवाचक)

३) भाववाचक नाम / धर्मवाचक नाम :
ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात.
हे घटक वास्तुस्वरुपात येत नाहीत.
उदा: सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गर्व इ.

टीप: गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे / धर्मवाचक नामे म्हणतात. विशेषनामे व सामान्य नामे हि भाव किंवा धर्म धारण करतात. म्हणून त्यांना धर्मवाचक नामे म्हणतात.

भाववाचक नामाचे तीन गात पडतात.
अ) स्थितिदर्शक: गरिबी, स्वतंत्र
ब)गुणदर्शक: सौंदर्य, प्रामाणिकपणा
क)कृतीदर्शक: चोरी, चळवळ

खालील प्रत्यय वापरून भाववाचक नामे करता येतील.
* या: सुंदर-सौंदर्य, गंभीर-गांभीर्य, मधुर-माधुर्य, धीर-धैर्य, क्रूर-क्रौर्य, शूर-शौर्य, उदार-औदार्य, नवीन-नाविन्य

*त्व: माणूस-मनुष्यत्व, शत्रू-शत्रुत्व, मित्र- मित्रत्व, प्रौढ-प्रौढत्व, जड-जडत्व, प्रभाव-प्रभुत्व, नेता-नेतृत्व.

*पण / पणा : देव-देवपण, बाल-बालपण, शहाणा-शहाणपण, वेद-वेडेपणा, चांगला-चांगुलपणा, म्हातारा-म्हातारपणा, मुर्ख-मूर्खपणा

* ई : श्रीमंत-श्रीमंती, गरीब-गरिबी, गोड-गोडी, चोर-चोरी, हुशार-हुशारी

* ता : नम्र-नम्रता, समान-समता, वक्र-वक्रता, वीर-विरत, एक-एकता, बंधू-बंधुता

* की : पाटील-पाटीलकी, माल-मालकी, आपला-आपुलकी, गाव-गावकी, माणूस-माणुसकी

* गिरी : गुलाम-गुलामगिरी, फसवा-फसवेगिरी, लुच्चा-लुच्चेगिरी, भामटा-भामटेगिरी, दादा-दादागिरी.

* वा : गोड-गोडवा, गार-गारवा, ओला-ओलावा, दूर-दुरावा, सुंगने-सुगावा, पुरवणे-पुरावा, थकणे-थकवा.

* आई : नवल-नवलाई, चपळ-चपळाई, चतुर-चतुराई, दिरंग-दिरंगाई, महाग-महागाई,
दांडगा-दांडगाई.

वाक्यातील नाम कसे ओळखावे?

१) वाक्याचा करता वा कर्म नामाच असते.
उदा: पारध्याने ससा पकडला.

२)षष्ठी प्रत्ययाच्या (चा, ची, चे, च्या) मागे व पुढे दोन्ही नामेच असतात.

उदा: आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला आहे.

३)शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो.
उदा: अ) सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही.
ब) पक्षी झाडावर बसला.

४)विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात.

उदा:
अ) सागराने प्रतिसाद दिला.
ब) काकांना नमस्कार सांगा.

५)सर्वानामाच्या झा, झी, झे, झ्या प्रत्ययानंतर नाम असते.

उदा: माझा सदरा, तुझे पुस्तक.
१)सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग.
एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ठ व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यांसाठी उपयोग केल्यास ते विशेषनाम होते.
अ)आमचा पोपट कालच गावाला गेला.
आ)आत्ताच नगरहून आला.
इ)शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या.
ई)आमची बेबी नववीत आहे.

२)विशेषनामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग.
एखाद्या विशेषनामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेकवचन म्हणून केल्यास ते सामान्यनाम होते.
अ)आमची बायको म्हणजे लक्ष्मी.
आ)तुमची मुलगी त्रटिकाच दिसते.
इ)आईचे सोळा गुरुवारांचे व्रत आहे.
ई)कालिदास हा भारताचा शेक्सपिअर आहे .
उ)आजच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम हवेत, सुदाम नकोत.

३)भाववाचक नामाचा विशेषनाम म्हणून उपयोग.

भाववाचक नामाचा उपयोगसुद्धा व्यक्ती साठी केल्यास टि विशेषनामे होतात.

अ)शांती हि माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे.
आ)माधुरी सामना जिंकली.

४)विशेषणसाधित नामे:
बऱ्याचदा विशेषणाचा उपयोग नामाप्रमाणे केला जातो. अशावेळी विशेषणांना नामाप्रमाणे विभक्ती प्रत्यय लागतात.

अ)शहाण्या माणसाला शब्दांचा मार.(विशेषण)-शहाण्याला शब्दाचा मार.(नाम)
आ)श्रीमंत माणसांना गर्व असतो.(विशेषण)-श्रीमंतांना गर्व असतो.(नाम)
इ)नकट्या मुलीच्या लग्नाला सतराशे विघ्न.(विशेषण)-नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.(नाम)
ई)आंधळा माणूस मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.(विशेषण)- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे. (नाम)
५)अव्ययसाधित नामे:

काही प्रसंगी अव्ययाचा वापर सुद्धा नामासारखा केला जातो.

अ)त्याच्या प्रत्येक वाक्यात ‘आणि’ चा वापर असतो.
आ)आमच्या शाळेच्या संघाने यंदा क्रिकेटची ट्रॉफी पटकावल्यामुळे खेळाडूंची खूप वाहवा झाली.

 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu